अल्बाट्रॉस सँडविच

लेखक – जयदीप चिपलकट्टी
(Associate professor Department of mathematics, University of Manitoba, Canada)

बेथ : तुला एखाद्या नवीन विषयावर संभाषण सुरू करायचं आहे असं तुझ्याकडे पाहिल्यावर वाटतं.
गिमेल : मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, पण तिच्यातलं मुख्य पात्र तसं का वागतं ह्यामागची कारणसंगती त्यात स्पष्ट झालेली नसेल. गोष्ट सांगून झाल्यानंतर, ज्यांची ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी उत्तरं देता येतील, असे प्रश्न तू मला विचार. आणि मग माझ्या उत्तरांच्या आधारे ही कारणसंगती तू शोधून काढ.
बेथ : मान्य आहे. निदान तूर्तास.
गिमेल : एक माणूस एका रेस्टॉरंटमध्ये आला, आणि त्यानं वेटरला अल्बाट्रॉस पक्ष्याच्या मांसाचं सॅँडविच मागितलं. सॅँडविच समोर आल्यानंतर त्यानं एक चावा घेतला, आपल्या कमरेचं रिव्हॉल्वर काढलं आणि स्वत:च्या कानशिलात गोळी मारून घेतली. त्यानं असं का केलं असेल?

बेथ : हा माणूस वेडा होता का?
गिमेल : नाही.
बेथ : त्या सॅँडविचमध्ये असं काही होतं का, की ज्यामुळे खाणाऱ्याचं डोकं फिरेल?
गिमेल : नाही.
बेथ : या माणसाला काही तात्कालिक भ्रम झाला होता का?
गिमेल : नाही.
बेथ : त्याच्या मनात दुसऱ्या कुणाला मारायचं होतं, पण गोळी चुकून स्वत:लाच लागली असं झालं का?
गिमेल : नाही.
बेथ : हा काहीतरी बनावाचा किंवा नाटकाचा प्रकार होता का?
गिमेल : नाही.
बेथ : हे सिनेमाचं शूटिंग होतं का?
गिमेल : नाही.
बेथ : या माणसानं स्वत:ला मारून घेतली ती खरोखरीच बंदुकीची गोळी होती का?
गिमेल : हो.
बेथ : ती कानशिलात घुसल्यामुळे तो मेला का?
गिमेल : हो.
बेथ : या माणसानं डोक्याला हेल्मेट घातलं होतं का?
गिमेल : नाही.
बेथ : त्यानं स्वत:ला गोळी मारून घेतली तेव्हा आपण मरणार अशी त्याची अपेक्षा होती का?
गिमेल : हो.

बेथ : मला प्रश्न सुचेनासे झाले आहेत. कोलरिजची ‘राइम ऑफ द एन्शन्ट मरीनर’ नावाची एक कविता आहे. तिच्यात अशी कल्पना आहे, की अल्बाट्रॉसची हत्या केली तर अपशकून होतो. या माणसाची तशी काही समजूत होती का?
गिमेल : नाही.
बेथ : हा माणूस एखाद्या राजकीय किंवा सामाजिक ध्येयाच्या प्रभावाखाली होता का?
गिमेल : नाही.
बेथ : हा माणूस शाकाहारी होता का?
गिमेल : नाही.
बेथ : त्या रेस्टॉरंटमध्ये टेबलखुर्च्या होत्या का?
गिमेल : हो.
बेथ : दोन आणि दोन चार होतात का?
गिमेल : हो.
बेथ : हा माणूस त्या वेटरला पूर्वीपासून ओळखत होता का?
गिमेल : नाही.
बेथ : वेटर त्या माणसाला पूर्वीपासून ओळखत होता का?
गिमेल : नाही.
बेथ : तो माणूस आणि वेटर यांचे यापूर्वी कसलेही परस्परसंबंध होते का?
गिमेल : नाही.
बेथ : सॅँडविच खाल्ल्यानंतर तो असं काही करेल याची वेटरला पूर्वकल्पना होती का?
गिमेल : नाही.
बेथ : ही घटना घडली त्या दिवशी मंगळवार होता का?
गिमेल : मला माझा नियम मोडावा लागणार आहे. या प्रश्नाचं ‘हो’ किंवा ‘नाही’ यापैकी कुठलंच उत्तर मला द्यायचं नाही.
बेथ : नियम तू केलेला होतास, तेव्हा तूच जर तो मोडणार असशील तर तुला खुलासा करावा लागेल.
गिमेल : बाब अशी आहे की त्या दिवशी कुठलाही वार असला तरी काही फरक पडत नाही. तेव्हा ‘हो’ किंवा ‘नाही’ याबरोबर ‘असंबंधित’ असं तिसरं एक उत्तर देण्याची मला मुभा हवी.
बेथ : का बरं?
गिमेल : हे बघ; माझ्या गोष्टीमध्ये काही माणसं, काही प्राणी, आणि काही वस्तू यांनी मिळून बनलेलं एक मर्यादित जग आहे. ग्रीकमध्ये ‘Κóσμος’ असा शब्द आहे, त्यावरून मी ह्या जगाला Κ असं नाव देणार आहे. आता Κ मध्ये ज्या घटना घडतात, त्यांच्यामागे काही कारणसंगती असते; आणि ही कारणसंगती Κ मध्ये पूर्वी घडलेल्या इतर घटना, आणि Κ मध्ये वावरणाऱ्या माणसांची मानसिकता, अशा दोहोंनी बनलेली असते. ह्या सगळ्याची गोळाबेरीज मिळून जी काही व्हायची ती गोष्ट होते. पण Κ बाहेरच्या जगातल्या घटना किंवा वस्तू किंवा माणसं या कारणसंगतीमध्ये भाग घेत नाहीत. त्यामुळे तू जर त्यांच्याबद्दल प्रश्न विचारलेस तर मला ‘असंबंधित’ असं उत्तर देणं भाग आहे. उदाहरणार्थ, समज जर तू विचारलंस की ‘त्या माणसाची आई मारकुटी होती का?’ तर मी ‘असंबंधित’ असं म्हणेन.
बेथ : पण मग मी जेव्हा दोन आणि दोन चार होतात का, असं विचारलं तेव्हा तू ‘हो’ का म्हणालास? तेव्हा तुला ‘असंबंधित’ असं का म्हणावंसं वाटलं नाही?
गिमेल : कारण ते असंबंधित नाही. आपल्या जगात जे सर्वसाधारण तर्कशास्त्राचे नियम आहेत तेच Κ मध्येही लागू होतात, असं मी गृहीत धरलेलं आहे.
बेथ : पण तू तसं आधी म्हणाला नाहीस.
गिमेल : मी म्हणालो नाही हे खरं, पण ते अध्याहृत आहे. आपल्याच जगात नव्हे तर Κ मध्ये देखील दोन आणि दोन चारच होतात. समज असं एक जग आहे, की जिथे दोन आणि दोन पाच होतात. तर तिथलं अांतरिक तर्कशास्त्र आपल्या जगापेक्षा इतकं वेगळं असेल की त्याचा कुठेकुठे कायकाय परिणाम होईल याचा काही भरवसा देता येणार नाही. अशा जगात कदाचित माणसं आनंदात असल्यामुळे आत्महत्या करत असतील. किंवा कदाचित बंदुकीच्या गोळ्या माणसांना जखम न करता फक्त गुदगुल्या करून डोक्यातून आरपार जात असतील, तेव्हा करमणूक म्हणून त्या मारून घ्यायला कुणाला काही वाटत नसेल. गंगेच्या काठावर जशी पैसे घेऊन कान कोरून देणारी माणसं बसतात तशी तिथे कदाचित डोक्यात गोळ्या मारून देणारी माणसं बसत असतील. अशा जगाविषयी प्रश्नही विचारण्यात अर्थ नाही, आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यातही नाही. पण वाराची गोष्ट तशी नाही. त्या दिवशी कुठला वार होता, यामुळे गोष्टीतल्या घटनांमागच्या कारणसंगतीवर काही फरक पडत नाही. म्हणून मी म्हणतो ‘असंबंधित’.
बेथ : पण जर खरोखरीच काही फरक पडत नसेल तर तू ‘नाही, त्या दिवशी मंगळवार नव्हता’ असं उत्तर का देत नाहीस?
गिमेल : कारण मग तू मला पेचात पाडू शकशील. समज मी मंगळवारला नाही म्हणालो, आणि मग बाकी सगळ्या वारांबद्दल तू नंतर असेच आणखी सहा प्रश्न विचारलेस तर? मला कुठल्यातरी एका वाराला ‘हो’ म्हणावं लागेल, कारण प्रत्येकाला ‘नाही’ म्हणत गेलो तर त्या दिवशी कुठलाच वार नव्हता असा त्याचा अर्थ होईल. त्या दिवशी Κ मध्ये कुठलाही विशिष्ट वार नव्हता, पण याचा अर्थ असा नव्हे की सोमवार ते रविवारपैकी कुठलाच वार नाही असा काहीतरी तो विलक्षण दिवस होता.
बेथ : मग यात काय अडचण आहे ते मला कळत नाही. मी जोपर्यंत वाराबद्दल काहीच विचारत नाही तोपर्यंत तुला काही निर्णय घेण्याची गरज नाही. पण जर मी विचारलं, तर कुठलातरी एक वार नक्की मनाशी ठरव आणि त्याला ‘हो’ म्हण.
गिमेल : ठीक आहे, सध्यातरी यात मला काही पेच लक्षात येत नाही. पण कदाचित पुढे येईल.
बेथ : मग एकसारखे एक सात प्रश्न विचारण्याऐवजी मी सरळ त्या दिवशी गुरुवार होता असं समजते. चालेल?
गिमेल : चालेल! अशासारखाच प्रकार वाङ्मयाच्या इतिहासात पूर्वी घडलेला आहे. अॅडम आणि इव्ह इडनमध्ये राहात असताना सापाच्या आग्रहाला बळी पडून इव्हनं ज्ञानवृक्षाचं फळ खाल्लं. हे फळ नेमकं कसलं होतं याचा जेनेसिसमध्ये उल्लेख नाही, आणि त्या कथेत बाकी एकूणच गोंधळ इतका आहे, की तसा तो नसल्यामुळे काही बिघडतही नाही. पण नंतर काही कारणाने लोक समजू लागले की ते सफरचंद होतं, आणि तसं समजल्यामुळेही काही बिघडत नाही.
बेथ : मान्य. एकूण या प्रकारात मला दिलासा वाटण्यासारखी बाब इतकीच की त्या दिवशी कुठला वार होता हे कळून काही उपयोग नाही. पण आईप्रकरणाबद्दल मात्र माझी शंका राहून गेलेली आहे. तुझ्या मते ‘त्या माणसाची आई मारकुटी होती का?’ ह्या प्रश्नाला ‘असंबंधित’ हे उत्तर आहे. पण ही बाब खरंच असंबंधित आहे असं मला वाटत नाही. आई मारकुटी असती तर कदाचित त्यामुळे त्याची मानसिक जडणघडण बिघडली असती, आणि सर्वसामान्य व्यक्तीला जी कारणं आत्महत्या करायला पुरेशी वाटत नाहीत, ती त्याला पुरेशी वाटली असती.
गिमेल : हे अशक्य आहे असं मी म्हणत नाही, पण मग त्या अर्थानं जगातली कुठलीच गोष्ट इतर कुठल्याच गोष्टीशी असंबंधित नसते. जेन ऑस्टिनच्या ‘प्राइड अँड प्रेज्यूडिस’ या कादंबरीत अगदी सुरवातीला असा प्रसंग आहे: मेरिटन या गावात एका संध्याकाळी एका बॉलमध्ये एलिझाबेथ बेनेट आणि फिट्झविल्यम डार्सी ह्या दोघांची भेट झाली. तिथे पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त संख्येने हजर असल्यामुळे प्रत्येक स्त्रीला प्रत्येक नाचाच्या वेळी पार्टनर मिळेलच अशी शाश्वती नव्हती. तेव्हा याच कारणापायी एका नाचाच्या वेळी एलिझाबेथला बाजूला बसून राहावं लागलं, आणि त्यावेळी डार्सीदेखील तिच्या जवळच पण तिच्याशी न बोलता घुमेपणाने उभा होता. डार्सीच्या मित्राने त्याला नाचात भाग घ्यायचा आग्रह केला, आणि एक छान मुलगी मागेच बसलेली आहे असं सुचवलं. यावर डार्सी मागे वळून बघत तिला ऐकू जाईल इतपत मोठ्या आवाजात म्हणाला की मुलगी दिसायला बरी आहे, पण मला मोह पाडण्याइतकी नाही. एलिझाबेथला ह्याचा अपमान वाटला, आणि तिच्या पुढच्या सगळ्या निर्णयांवर या प्रसंगाचा मोठा प्रभाव पडला. पण ही बारीकसारीक कलाकुसर चालू होती, त्याच्या आगेमागे कित्येक वर्षं, युरोपखंडात कित्येक ठिकाणी, इंग्लंडचं नेपोलियनच्या सैन्याविरुद्ध सतत युद्ध सुरू होतं. ह्या युद्धाचा एलिझाबेथवर किंवा निदान कादंबरीतल्या इतर पात्रांवर काही प्रभाव पडला का? म्हटलं तर हो, आणि म्हटलं तर नाही. कादंबरीत कुठेही त्या युद्धाचा उल्लेख नाही, तेव्हा तसा काही थेट संबंध दाखवता येणार नाही. पण समज नेपोलियन इंग्लंडमध्ये घुसला असता तर सगळ्या इंग्लिश समाजावरच त्याचा निर्णायक प्रभाव पडला नसता का? आणि कदाचित सगळ्याच पात्रांच्या आयुष्यांत उलथापालथ झाली नसती का? बॉलडान्सिंगचे सगळ्यांचे सगळे बेत उलटेसुलटे नसते का झाले? तेव्हा तो तसा न घुसणं हाच मोठा प्रभाव आहे. किंवा असं समज की तू एकटी नाटकाला गेलेली आहेस. तुला नाटक आवडतं की नाही याचा निर्णय तुझ्या शेजारच्या खुर्चीवर कोण बसलं आहे यावर अवलंबून असत नाही. पण जर तोंडाचा घाण वास येणारा गलेलठ्ठ माणूस शेजारी बसला असेल, तर मात्र या निर्णयावर चांगलाच प्रभाव पडतो. नपेक्षा प्रभाव न पडणं इतपतच प्रभाव पडतो. तेव्हा आईचा मारकुटेपणा असंबंधित आहे असं मी म्हणतो, त्याचा अर्थ हा घ्यायचा.

बेथ : ठीक आहे. आपण प्रश्नोत्तरांना पुन्हा सुरुवात करू, पण त्याआधी मला एक संकेत सुचवायचा आहे. मी प्रश्न विचारणं आणि तू ‘हो’ किंवा ‘नाही’ उत्तर देणं, ही संभाषणाची एक पातळी झाली. पण समज आपल्यापैकी कुणा एकाला तिथे न राहता त्या पातळीच्या वर जाऊन काही शंका काढायची असेल किंवा भाष्य करायचं असेल, तर त्यानं ‘मेटा’ असं म्हणून परवानगी विचारावी. दुसऱ्यानं त्याला ‘मेटा’ असं म्हणून दुजोरा दिला की मग पहिल्या व्यक्तीला ते भाष्य करायला मुभा असेल. ग्रीकमध्ये μετά चा अर्थ ‘पलीकडे’ किंवा ‘वर’ असा होतो; इथे आपण तो ‘चालू पातळीच्या वर’ असा घ्यावा असं मी सुचवते आहे. अनेक शास्त्रांमध्ये अशा प्रकारचा संकेत वापरला जातो. उदाहरणार्थ, कोणत्या मानवी कृती चांगल्या आणि कोणत्या वाईट याचा नीतिशास्त्रामध्ये खल होतो. पण हा खल कुठल्या सैद्धांतिक आधारांवर करायचा ह्याच मुद्द्याचा जर खल करायचा असेल, तर त्याला मेटानीतिशास्त्र म्हणता येईल.
गिमेल : मला संकेत आवडला. पण तू संस्कृत शब्दाला ग्रीक उपसर्ग जोडते आहेस हे धार्ष्ट्याचं आहे.
बेथ : त्यात काय गैर आहे? जर अरिस्टॉटल आणि चाणक्य एकमेकांना भेटले असते, तर हा शब्द तेव्हाच तयार झाला असता. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत. एका इंग्रजी कॉमिक बुक सीरीजमध्ये ‘नेक्रोमंत्रा’ नावाची नायिका आहे. किंवा मला ‘श्रीडेटा’ नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी ऐकून माहीत आहे.
गिमेल : स्पृष्टोस्मि!
बेथ : पण एकूण तुला संकेत मान्य आहे?
गिमेल : हो. म्हणजे ‘त्या दिवशी मंगळवार होता का?’ असा मगाशी तू प्रश्न विचारलास, तेव्हा प्रत्युत्तर म्हणून मी ‘मेटा’ असं म्हणायला हवं होतं.
बेथ : तेव्हा तो संकेत अजून लागू झालेला नव्हता, पण हो.
गिमेल : तेव्हा मी तसं म्हणालो असतो तर कदाचित हा संकेत आपोआपच तयार झाला असता. संकेतांचं रहस्य हेच आहे. पण ते एक असो. मी असं सुचवतो की ‘मेटा’नंतर होणाऱ्या चर्चेचा ज्याला शेवट करायचा असेल त्यानं ‘मेटान्त’ असं म्हणावं. त्याला दुसऱ्यानं दुजोरा दिला की आपण पुन्हा खालच्या पातळीवर आलो असं समजू. मेटान्त.
बेथ : मेटान्त.

बेथ : रेस्टॉरंटमध्ये गेलेला माणूस तरुण होता का?
गिमेल : हो.
बेथ : वेटर तरुण होता का?
गिमेल : असंबंधित.
बेथ : ह्या तरुण माणसाचं लग्न झालेलं होतं का?
गिमेल : नाही.
बेथ : त्याचा प्रेमभंग झाला होता का?
गिमेल : नाही.
बेथ : हा माणूस गुन्हा करून फरारी झालेला होता का?
गिमेल : नाही.
बेथ : तो शिक्षा भोगून आलेला होता का?
गिमेल : नाही.
बेथ : त्याने गुन्हा केलेला नव्हता, पण त्याच्यावर आळ आला अशी काही परिस्थिती होती का?
गिमेल : नाही.
बेथ : या माणसाला कोणी शत्रू होते का?
गिमेल : नाही.
बेथ : प्रत्यक्षात जे या माणसाला शत्रू मानत नव्हते पण ज्यांना तो शत्रू मानत असे, अशा कोणी व्यक्ती होत्या का?
गिमेल : नाही.
बेथ : त्याचा कुणी पाठलाग करत होतं का?
गिमेल : नाही.
बेथ : हा माणूस मेला तेव्हा पैशाच्या अडचणीत होता का?
गिमेल : नाही.
बेथ : त्या सॅँडविचचं बिल भागवण्याइतके पैसे त्याच्या खिशात होते का?
गिमेल : हो.
बेथ : रेस्टॉरंटमध्ये जाण्यापूर्वी त्यानं रिव्हॉल्वर नुकतंच मिळवलेलं होतं का?
गिमेल : नाही.
बेथ : तो नेहमीच कमरेला रिव्हॉल्वर बाळगत असे का?
गिमेल : हो.
बेथ : तो लष्करात होता का?
गिमेल : नाही.
बेथ : तो कसल्याही सरकारी नोकरीत होता का?
गिमेल : नाही.
बेथ : हा माणूस रेस्टॉरंटमध्ये शिरला तेव्हा आत्महत्या करायचं ठरवून आला होता का?
गिमेल : नाही आणि मेटा.
बेथ : मेटा.
गिमेल : तू माझ्या ह्या उत्तराचा वापर अतिशय जपून करावास असं मला सुचवायचं आहे. मेटान्त.
बेथ : थॅँक यू, पण आपण प्रतिस्पर्धी आहोत अशी माझी समजूत होती.
गिमेल : आपण प्रतिस्पर्धी नव्हे तर सहप्रवासी आहोत. मेटान्त.
बेथ : मेटान्त. या माणसाला जर तिथे अल्बाट्रॉस सॅँडविच मिळालं नसतं, तरीही त्यानं आत्महत्या केली असती का?
गिमेल : नाही.
बेथ : अल्बाट्रॉस सॅँडविच हा या माणसाच्या आवडीचा पदार्थ होता का?
गिमेल : नाही.
बेथ : नावडीचा पदार्थ होता का?
गिमेल : नाही.
बेथ : त्यानं सॅँडविचचा चावा घेतला तो घास त्यानं गिळला का?
गिमेल : असंबंधित.

बेथ : मला ओपनिंग सापडत नाहीय. ही गोष्ट पृथ्वीवर घडली का?
गिमेल : हो.
बेथ : ही गोष्ट उत्तर गोलार्धात घडली का?
गिमेल : नाही.
बेथ : ग्रीनिचच्या पूर्वेला घडली का?
गिमेल : हो.
बेथ : आफ्रिका खंडात घडली का?
गिमेल : नाही.
बेथ : आशिया खंडात घडली का?
गिमेल : नाही.
बेथ : ऑस्ट्रेलियामध्ये घडली का?
गिमेल : हो.
बेथ : लव्हली. ही गोष्ट ऑस्ट्रेलियात घडण्याला महत्त्व आहे का?
गिमेल : मेटा.
बेथ : मेटा.
गिमेल : कथानकातल्या एखाद्या घटकाला महत्त्व आहे की नाही याला काही निश्चित उत्तर असत नाही, कारण हा गुंतागुंतीचा आणि काही प्रमाणात तरतमभावाचा प्रश्न आहे. एलिझाबेथ आणि डार्सी यांचे एकमेकांबद्दल गैरसमज होणं याला अतिशय महत्त्व आहे. एलिझाबेथला अनेक बहिणी असणं ह्याला त्यापेक्षा कमी महत्त्व आहे, आणि तिच्या बहिणींची संख्या नेमकी चार असणं ह्याला त्याहीपेक्षा कमी महत्त्व आहे. तरुण अविवाहित स्त्रीपुरुषांनी एकमेकांशी एकान्तात बोलणं, एकमेकांबरोबर नाच करणं हे सगळीकडच्या रिवाजात बसत असेलच असं नाही, तेव्हा कादंबरी एकोणिसाव्या शतकातल्या इंग्लंडमध्ये घडण्याला निदान तितपत महत्त्व आहे. माझ्याही गोष्टीचं थोडंफार तसंच आहे. तिच्यामध्ये जशा घडल्या तशासारख्या घटना जगात इतर काही ठिकाणी घडू शकल्या असत्या, तेव्हा त्या अर्थाने ऑस्ट्रेलियाला महत्त्व नाही. पण ही गोष्ट जगात अगदी कुठेही घडू शकली असती हे मात्र खरं नाही, तेव्हा त्या अर्थाने ऑस्ट्रेलियाला महत्त्व आहे. अर्थात मला ‘प्राइड अॅँड प्रेज्यूडिस’पेक्षा जास्त समर्पक उदाहरण देणं शक्य आहे, पण मग माझ्या गोष्टीमागचं रहस्य लागलीच उघं पडेल.
बेथ : पण समज तुझी गोष्ट फ्रान्समध्ये घडली असती –
गिमेल : फ्रान्समध्ये ही गोष्ट घडू शकली नसती.
बेथ : ठीक आहे; गोष्ट पुरती माहीत नसल्यामुळे तुझा निर्वाळा मान्य करणं मला भाग आहे. पण असं समज की आटपाट नगर नावाची दुसरी एक अशी जागा आहे, की जिथे ही गोष्ट घडू शकली असती. तर तिच्यात ऑस्ट्रेलियाऐवजी आटपाट नगरातले वेगळे स्थानिक संदर्भ मिसळले गेले असते, आणि ती एक वेगळी गोष्ट झाली असती.
गिमेल : स्थानिक संदर्भ दरवेळेला तितकेच महत्त्वाचे असतात असं नाही. स्थानिक संदर्भ बदलले की गोष्ट पूर्णपणे बदलली असं दरवेळेला मी म्हणणार नाही. व्लादिमिर नाबोकोव्हची ‘करोल, दामा, व्हल्येत (राजा, राणी, गुलाम)’ ह्या नावाची एक कादंबरी आहे. मूळ कादंबरी रशियनमध्ये आहे, पण बऱ्याच वर्षांनी लेखकाने स्वत:च तिचं इंग्रजीत भाषांतर केलं. भाषांतराच्या प्रस्तावनेत तो म्हणतो, की कादंबरी लिहिली तेव्हा मी बर्लिनमध्ये राहात होतो, बर्लिनमधले रस्ते आणि तिथलं हवामान यांची मला बऱ्यापैकी माहिती झालेली होती, म्हणून ती बर्लिनमध्ये घडते असं मी लिहिलं. पण तशी ती रोमानिया किंवा हॉलंडमध्येही घडू शकेल.
बेथ : मला हे म्हणणं बरोबर वाटत नाही. समज कादंबरी अॅमस्टरडॅममध्ये घडते आहे. आणि समज तिच्यातलं फ्रान्झ हे पात्र वेश्यावस्तीतून हिंडत असताना तिथली विमनस्क करणारी दृश्यं बघून त्याचा जीवनविषयक दृष्टिकोण पालटतो. असं जर झालं तर त्यामुळे पुढच्या सगळ्या घटना बदलणार नाहीत का?
गिमेल : पण लेखकाला यात स्वातंत्र्य आहे हे तू विसरतेस. फ्रान्झला वेश्यावस्तीत जाऊ द्यायचं की नाही हे ठरवणं त्याच्या हातात आहे.
बेथ : अॅमस्टरडॅममधली वेश्यावस्ती जगप्रसिद्ध आहे. ती टाळणं तितकं सोपं नाही. जर शहरात फ्रान्झ एकटा राहात असेल आणि तो तिथे कधीच फिरकला नाही, तर यात काहीतरी भानगड आहे अशी वाचकाला नक्की शंका येईल.
गिमेल : आता यावर मी काय बोलणार? मी म्हणेन, की जगात अशी काही ठिकाणं आहेत की माझी गोष्ट ऑस्ट्रेलियात न घडता तिथे घडली तर थोडीशी बदलेल खरी, पण तिचा गाभा तोच राहील. अर्थात एखाद्या गोष्टीचा गाभा ही अचूक बोट दाखवण्यासारखी वस्तू नाही, हे मला कबूल आहे. तो नेमका कुठे आहे याबद्दल वाद घालायला जागा असतेच.
बेथ : पण जर आपण खरंच तसा वाद घालायला लागलो, तर मला तुझ्या गोष्टीमागची कारणसंगती माहीत नाही ही परिस्थिती माझ्या पथ्यावरच पडेल. मी वाटेल तसा वाद घालू शकेन, आणि याउलट तपशिलाचा उल्लेख न करण्याचं तुझ्यावर बंधन असल्यामुळे तुला फारसं बोलता येणार नाही. तेव्हा एकूण लढाई तुल्यबळ होणार नाही. म्हणून मी म्हणते मेटान्त.
गिमेल : थॅँक यू आणि मेटान्त.

बेथ : जिथे अल्बाट्रॉस आढळत नाहीत, अशा ठिकाणी ही गोष्ट घडू शकली असती का?
गिमेल : नाही.
बेथ : ही गोष्ट न्यूझीलंडमध्ये किंवा दक्षिण अमेरिकेत घडू शकली असती का?
गिमेल : हो.
बेथ : अल्बाट्रॉस हा समुद्रपक्षी असण्याला त्यात महत्त्व आहे का?
गिमेल : हो.
बेथ : ही गोष्ट एखाद्या बंदरावर घडली का?
गिमेल : हो.
बेथ : हा माणूस खलाशी होता का?
गिमेल : हो.
बेथ : तो नुकताच समुद्रप्रवासावरून आलेला होता का?
गिमेल : हो.
बेथ : हा प्रवास निर्विघ्नपणे पार पडला का?
गिमेल : नाही.
बेथ : तो एकटाच समुद्रावर गेला होता का?
गिमेल : नाही.
बेथ : अनेक माणसांबरोबर गेला होता?
गिमेल : हो.
बेथ : ज्यातून तो प्रवास करत होता ते जहाज बुडालं का?
गिमेल : नाही.
बेथ : त्यांच्या जहाजाला काही हानी पोहोचली का?
गिमेल : नाही.
बेथ : त्यांच्यावर चाच्यांचा हल्ला झाला का?
गिमेल : नाही.
बेथ : जहाजावर बंडाळी झाली का?
गिमेल : नाही.
बेथ : ते एखाद्या वादळात सापडले होते का?
गिमेल : हो.
बेथ : पण त्यातून ते सुखरूप बाहेर आले?
गिमेल : हो.
बेथ : वादळामुळे त्यांची वाट चुकली असं काही झालं का?
गिमेल : हो.
बेथ : आणि ते समुद्रात भरकटले?
गिमेल : हो.
बेथ : इतर कुठल्या जहाजानं त्यांना मदत केली का?
गिमेल : नाही.
बेथ : ते भरकटल्यानंतर त्यांच्याकडचा अन्नसाठा संपला का?
गिमेल : हो.
बेथ : आणि त्यांच्यावर उपासमारीचा प्रसंग आला?
गिमेल : हो.
बेथ : आहा! आणि त्यांनी अल्बाट्रॉस खाऊन भूक भागवली?
गिमेल : नाही.
बेथ : नाही?! पण मग त्यांनी मासे किंवा इतर काही प्राणी खाऊन भूक भागवली का?
गिमेल : नाही.

बेथ : त्यांनी माणसाचं मांस खाऊन भूक भागवली का?
गिमेल : हो.
बेथ : अनेक माणसं खाऊन?!
गिमेल : नाही.
बेथ : एकच माणूस खाऊन?
गिमेल : हो.
बेथ : क्यूरियसर अँड क्यूरियसर. मग हा जो एकच माणूस त्यांनी खाल्ला तो आपल्या खलाशाच्या ओळखीचा होता का?
गिमेल : मेटा.
बेथ : मेटा.
गिमेल : ही गोष्ट ऑस्ट्रेलियात घडण्याला किती महत्त्व आहे हा विषय मगाशी निघाला होता, पण आपली ही प्रश्नोत्तरं मराठीत असण्याला किती महत्त्व आहे हा विषय निघाला नव्हता. मेटान्त.
बेथ : मेटान्त. ही जी एकच व्यक्ती त्यांनी खाल्ली ती आपल्या खलाशाच्या ओळखीची होती का?
गिमेल : हो.
बेथ : ही व्यक्ती स्त्रीलिंगी होती का?
गिमेल : हो.
बेथ : आपल्या खलाशाची ती प्रेयसी होती का?
गिमेल : हो.
बेथ : खलाशानेही तिचं मांस खाल्लं का?
गिमेल : हो.
बेथ : तिला मुद्दाम ठार मारण्यात आलं होतं का?
गिमेल : नाही.
बेथ : ती अल्बाट्रॉस पक्ष्याचं मांस खाल्ल्यामुळे मेली का?
गिमेल : नाही.
बेथ : ती मरण्यात अल्बाट्रॉस पक्ष्यांचा काही हात होता का? – पंख होता का?
गिमेल : नाही.
बेथ : ती उपासमार झाल्यामुळे मेली का?
गिमेल : हो.
बेथ : ती मेली हे खलाशाला माहीत होतं का?
गिमेल : हो.
बेथ : आणि ती कशामुळे मेली हेही माहीत होतं का?
गिमेल : हो.

बेथ : ह्या स्त्रीला अल्बाट्रॉस पक्षी आवडत होते का?
गिमेल : असंबंधित.
बेथ : पूर्वायुष्यात तिचा अल्बाट्रॉसशी काही संपर्क आलेला होता का?
गिमेल : असंबंधित.
बेथ : त्या जहाजावर काही अल्बाट्रॉस पाळलेले किंवा पकडलेले होते का?
गिमेल : नाही.
बेथ : जहाजाच्या आसपास कुठे अल्बाट्रॉस होते का?
गिमेल : हो.
बेथ : जहाजावरच्या माणसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला का?
गिमेल : हो.
बेथ : पण त्यांना ते सापडले नाहीत?
गिमेल : नाही.
बेथ : त्यांना अल्बाट्रॉस सापडले नाहीत, हे खलाशाला माहीत होतं का?
गिमेल : नाही.

बेथ : हं. खलाशाने जेव्हा आपल्या प्रेयसीचं मांस खाल्लं, तेव्हा आपण काय खातो आहोत हे त्याला माहीत होतं का?
गिमेल : नाही.
बेथ : आपण अल्बाट्रॉस खातो आहोत असा त्याचा समज होता का?
गिमेल : हो.
बेथ : जहाजावरच्या इतर माणसांनी तसा त्याचा समज करून दिला होता का?
गिमेल : हो.
बेथ : हा माणूस रेस्टॉरंटमध्ये आला तेव्हा त्यानं पूर्वी कधी अल्बाट्रॉस खाल्लेला होता का?
गिमेल : नाही.
बेथ : मला वाटतं मला गोष्ट समजली. ह्या माणसानं आपल्या प्रेयसीचं मांस खाल्लं तेव्हा ते अल्बाट्रॉसचं आहे असं इतरांनी त्याला सांगितलेलं होतं, पण खऱ्या गोष्टीची त्याला कुणकूण होती. म्हणून मुद्दाम अल्बाट्रॉसची चव बघायला तो रेस्टॉरंटमध्ये आला. त्याची जेव्हा खात्री झाली, तेव्हा तो धक्का सहन न होऊन त्यानं आत्महत्या केली.
गिमेल : बरोबर ओळखलंस. पण खरं तर तसं करण्याचं कारण नव्हतं. त्याची प्रेयसी मेली यात खलाशाचा काही दोष नव्हता, तेव्हा तिचं मांस त्यानं खाल्लं यात अपराधी वाटून घेण्यासारखं काही नव्हतं. प्रेत नुसतं समुद्रात सोडून देण्यापेक्षा त्याचा निदान उपयोग तरी झाला.
बेथ : युटिलिटेरियन एथिक्स प्रमाण मानून ह्या प्रसंगाचा तू विचार करतो आहेस. पण गोष्ट सांगणाऱ्याचं तत्त्वज्ञान गोष्टीतल्या माणसाला बंधनकारक नसतं. तुझ्याइतका भावनिक बर्फाळलेपणा त्या खलाशामध्ये नसूही शकेल.
गिमेल : मान्य आहे; पण त्याचं वागणं मला पटलं नाही हेही तितकंच खरं. आता कदाचित त्याच्या आईने प्रेमाची ऊब दिल्यामुळे तो तसा झाला असेल. पण हे मला कसं माहीत असणार?

Post new comment